fbpx

कुजबुजीतून गर्जनेकडे

आज विद्यानंदचं कौतुक करायला आपण इथे जमलो आहोत. गणपती उत्सवात किंवा थोड्या व्यापक दृष्टीने सगळ्या धार्मिक उत्सवांमध्ये होणारं ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास, हा त्याच्या मोहिमेचा मुख्य मुद्दा होता.
विद्यानंदचं कौतुक अशासाठी की त्याने संयमाने, फारसा तोल ढळू न देता सगळ्या विरोधाला युक्तिवाद करून उत्तरं दिली. प्रसंगी संस्कृत श्लोकांचे दाखले देण्याच्या त्याच्या शैलीमुळे आणि अभ्यासपूर्ण विवेचनामुळे विरोधकांची पंचाईत झाली. स्वत:च्या भूमिकेचा पुनरुच्चार ठामपणे न कंटाळता करणं ही सुद्धा एक कौतुकाची बाब!
माझ्या लेखी फार महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे तो ध्वनीप्रदूषण इथवरच थांबला नाही तर बुद्धीप्रामाण्यवादी नास्तिकतेचा पाठपुरावाही त्यानं केला! ही लाखमोलाची बाब आहे. भर गणेश उत्सव तोंडावर आलेला असताना मी नास्तिक आहे असं म्हणण्याचं धाडस भले भले करणार नाहीत. नास्तिकाच्या भूमिकेला समजून न घेणारी मंडळी ‘नास्तिक म्हणजे अश्रद्ध’ असं सोपं समीकरण करतात. विद्यानंद, त्यालाही थेट छेद देतो.
त्याची समाजहितयोग्य भूमिकेवरची निष्ठा ही त्याची श्रद्धा ठरते. That is his faith.
His unwavering faith in a cause larger than himself may be more meaningful than ritualistic theism.
नास्तिक असूनही बहुतांश सर्वसामान्य पुणेकर त्याच्या मागे उभे राहिले हे ही विशेष म्हणावं लागेल. तितकंच महत्त्वाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं suo moto म्हणजे स्वत:हून, सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारं ध्वनीप्रदूषण बंद करण्यासाठी आणि नागरिकांना होणारा उपद्रव कमी करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, यात लक्ष घातलं.
माझ्या मते बापटांचा संघर्ष हा नागरिकांनी व्यवस्थेविरुद्ध उभारलेल्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करतो. मँचेस्टर / स्पेनमध्ये स्थानिक रहिवाशांनी प्रचंड प्रमाणात बोकाळलेल्या पब्स आणि डिस्को जागांमधून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरुद्धचा लढा, किंवा हीथ्रो विमानतळाच्या शेजारी हॅटनमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी उभारलेला संघर्ष ही सामूहिक लढ्यांची काही उदाहरणं.
तर एक एकट्या नागरिकांनी उभारलेले – भोपाळमधल्या राशिदा बी आणि चंपा देवी शुक्ला असो, केनियामधला वंगारी माथाई लढा असो, अमेरिकेतल्या एरिन ब्रोकोविचने सुरुवात केलेला कायदेशीर संघर्ष असो… जगात अशी असंख्य उदाहरणं आहेत.
काही लढ्यांमुळे नियम बदलले गेले, काहींमुळे स्थानिक रहिवाशांना नुकसान भरपाई मिळाली, काहींमुळे अन्याय आणि शोषण थांबलं तर काहींनी संघर्षाची ठिणगी पाडून एका वणव्याची सुरुवात केली.
महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संघर्ष करण्याची तयारी प्रत्येकानं ठेवली पाहिजे. संधीसाधूपणे किंवा बोटचेपेद्धतीनं पदरात येईल ते खाली मान घालून स्वीकारणं हा स्वभाव बदलण्याची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या वैयक्तिक पातळीवर विरोध करत राहिलं पाहिजे.
ध्वनीप्रदूषणासारखेच इतरही अनेक नागरी मुद्दे वृक्षतोड असो, नदी पात्रातील आणि पादचारी मार्गांवरील अतिक्रमण, कचऱ्याचे व्यवस्थापन, पाण्याचे नियमन, रस्त्यावरील खड्डे… हे सगळे नागरिकांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न आहेत.
हे प्रश्न सोडवायला प्रत्येकानं सक्रिय झालं पाहिजे. शक्य तितक्या प्रकारे आवाज उठवत प्रतिकार करत राहिलं पाहिजे. A single voice may whisper, but many small voices can become a roar.